चेन्नई : वृत्तसंस्था । “राज ठाकरे… तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे…हो, माझ्याकडून भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणं सुरूच राहिल”, अशी ग्वाही एम के. स्टॅलिन यांनी दिली आहे.
दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत तमिळनाडूमध्ये एम के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. या विजयाबद्दल एम के. स्टॅलिन यांना अनेक राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तामिळनाडूत द्रमुकचा विजय स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, तुम्हीही प्राधान्य द्याल आणि राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही रहाल, अशी आशा राज ठाकरे यांनी स्टॅलिन यांना शुभेच्छा देताना व्यक्त केली होती. त्यावर आता स्टॅलिन यांनीही राज ठाकरेंचे आभार मानले असून त्यांना एक ग्वाही दिली आहे.
करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि मित्र पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले. २३४ सदस्यीय विधानसभेत द्रमुकला १२५ च्या आसपास जागा मिळाल्या. काँग्रेस, डावे पक्ष या आघाडीतील मित्र पक्षांना मिळालेल्या जागांवरून द्रमुक आघाडीने १४५ जागांवर विजय संपादन केला. जयललिता यांच्या निधनानंतर करिश्मा असलेला चेहरा नसतानाही अण्णा द्रमुकला ७५ पेक्षा अधिक जागा मिळाल्या. अण्णा द्रमुकबरोबर युती केलेल्या भाजपाने राज्यात हातपाय पसरण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. भाजपाला तीन जागांवर आघाडी मिळाली होती. चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी मक्कल निधी मयम हा पक्ष स्थापन करून राज्यात राजकीय वातावरण तापविले होते. आपला पक्ष राज्यात चांगली कामगिरी करेल, असा दावा ते करीत होते. पण कमल हसन यांचा एकमेव अपवाद वगळता पक्षाचा पार धुव्वा उडाला.
रशियाचे तत्कालीन अध्यक्ष स्टॅलिन यांच्या निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत सहभागी झाले असतानाच करुणानिधी यांना मुलगा झाल्याचा निरोप देण्यात आला व त्यावरून त्यांनी मुलाचे नाव स्टॅलिन ठेवले. स्टॅलिन सुरुवातीपासूनच आक्रमक आणि बंडखोर स्वभावाचे. करुणानिधी यांच्या हयातीतच त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली. शेवटी २००९ मध्ये उपमुख्यमंत्रिपद देऊन त्यांचे समाधान करण्यात आले होते. करुणानिधी यांचे राजकीय उत्तराधिकारी होण्यासाठी दोन मुलांमध्ये वाद सुरू झाला तेव्हा करुणानिधी यांनी स्टॅलिन यांना झुकते माप दिले. उपमुख्यमंत्रिपद, चेन्नईचे महापौरपद आणि करुणानिधी सरकारमध्ये ग्रामविकास व स्थानिक प्रशासन खाती त्यांनी भूषविली होती. लोकांमध्ये काम करून मगच सत्तेत पद भूषविण्याचा सल्ला वडील करुणानिधी यांनी मागे एकदा जाहीरपणे दिला होता. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर द्रमुकची सारी सूत्रे हाती घेत राज्यभर यात्रा काढली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, डावे पक्ष यांना बरोबर घेत स्टॅलिन यांनी लक्ष्य साध्य केले.