भारूडखेडा येथे दिव्यांग महिलेस मारहाण; नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील भारुडखेडा येथे दारू विक्रीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एक दिव्यांग महिला जखमी झाली असून या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की ,भारुडखेडा येथील रहिवासी रंजीता शांताराम गोसावी (वय ३० वर्षे ) यांच्या घरी जाऊन गावातील काही जणांनी दारू बंद करण्याबाबत हुज्जत घातली. सदर महिलेचे म्हणणे होते की ,आम्ही लॉक डाऊन सुरु झाल्यापासून गेल्या म्हणजेच गेल्या तीन महिन्यांपासून दारू बंदी केलेली आहे. तुम्ही आम्हाला त्रास का देता ? असे रंजिता गोसावी म्हणाल्या. दरम्यान रंजीता गोसावी यांच्या वडील आणि भाऊ सोबत त्यांनी हुज्जत घातली. यानंतर या शाब्दीक बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले. यात रंजीता शांताराम गोसावी यांच्या डोक्याला काठीचा मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी भारुडखेडा येथील अरुण लालु गोसावी, राजू लालू गोसावी, कैलास गोसावी, रवींद्र गोसावी, पवन राजू गोसावी, अर्जुन गोसावी, गब्बर हिरा गोसावी, अर्जुन राजू उमट व अनिल गुलाब गोसावी यांच्याविरुद्ध रंजीता शांताराम गोसावी यांच्या फिर्यादीवरून ३२४, १४३ ,१४७, १४८ ,१४९, १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत सर्व दंगेखोर पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यात वापरण्यात आलेल्या लाठ्या-काठ्या जप्त केल्या असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्‍वर बाविस्कर हे करीत आहेत.

Protected Content