अहमदनगर: वृत्तसंस्था । प्रलंबित कृषी विधयक मोदी सरकारने पारित केले व देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्याविरोधात ‘भारत बंद’ चा नारा जे देत आहेत, तेच शेतकरी विरोधी आहेत हे सिद्ध करतायत,’ असा घणाघात माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला. ‘कृषी विधेयक विरोधात दिलेल्या ‘भारत बंद’ मध्ये कोणतेही तथ्य नाही. हा केवळ पोकळ वासा आहे. संबंधित संघटनाना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ते नगरमध्ये बोलत होते.
संसदेत विरोधकांचा विरोध डावलून केंद्र सरकारने कृषी विधेयक सहमत केले आहे. या कृषी विधेयकाविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’आंदोलन सुरु केले. हे आंदोलन पुकारणाऱ्या संघटनांवर माजी मंत्री शिंदे यांनी निशाणा साधला.
काही जण ‘भारत बंद’ची हाक देऊन शेतकरी विरोधी भूमिका मांडण्याचा प्रयत्न देशामध्ये करत आहेत. हे विधेयक नेमके काय आहे ? त्यातील तरतुदी काय आहेत ? शेतकऱ्यांना काय सुविधा मिळणार आहेत ? हे बारकाईने अभ्यासले तर हे शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक आहे, हे लक्षात येते. शेतकरी या विधेयकाच्या बाजूने राहतील, असा विश्वास आहे. मात्र काही जण ‘भारत बंद’ची हाक देऊन ते स्वतःच शेतकरी विरोधी आहेत, हे सिद्ध करतात. देशात सरकार यशस्वीरित्या काम करत आहे. अशा वेळी विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसतो. तेव्हा एखाद्या विधेयकांवर संभ्रम निर्माण केला जातो. कारण विधेयक सविस्तर अनेक जण वाचत नसतात. सध्या असाच प्रयत्न काही शेतकरी संघटना करताना दिसत आहेत. ज्यांना शेतकऱ्यांचा खरच कळवळा आहे, त्यांनी या विधेयकाचे स्वागत करणे गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले.