भारत -चीन वादात रशियाची सक्रिय मध्यस्थी

मॉस्को: । वृत्तसंस्था । भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या वादात रशियाने केलेल्या मध्यस्थीमुळे अनेक देश हैराण झाले आहेत. या वादात अमेरिकेपेक्षा रशियाने अधिक सक्रीय भूमिका बजावली. मॉस्कोत झालेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारत-चीन दरम्यान बैठक पार पडली. भारत-चीनला एक व्यासपीठ दिले असून याद्वारे सीमा प्रश्न चर्चेतून सोडवता येऊ शकतो, असेही रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.

मॉस्कोमध्ये भारत-चीन दरम्यान तणाव कमी करण्यासाठी काही निर्णय झाले आहेत. मात्र, हे निर्णय प्रत्यक्षात किती काळ टिकेल याबद्दल तज्ञांना अजूनही शंका आहे. दोन्ही देशांचे हजारो सैनिक उभे ठाकले आहेत. मात्र, या वादाच्या माध्यमातून, रशिया पुन्हा एकदा जागतिक पातळीवर दोन देशांतील वाद सोडविण्यासाठी सक्षम असणारा देश अशी आपली प्रतिमा बनवत आहे. त्यासाठीच रशियाचे हे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

दक्षिण आशियातील आपला प्रभाव आणखी बळकट करण्यासाठी रशियाचे हे प्रयत्न सुरू असल्याचे तज्ञांचे मत आहे. मॉस्कोतील रशियन अॅकेडमी ऑफ सायन्सेसशी संबंधित अलेक्सी कुप्रिनोव्ह यांनी सांगितले की, रशिया अनेक कारणांमुळे दक्षिण आशियातील राजकारणात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून १९८० आणि १९९० च्या दशकात रशियाचा असलेला प्रभाव, दबदबा पुन्हा एकदा निर्माण होईल. त्याशिवाय अफगाणिस्तानमध्ये जिव्हारी लागलेला पराभव ही विसरता येऊ शकतो.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन २००० मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपल्या देशाच्या दुर्बल स्थितीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वात रशिया पुन्हा एकदा आशिया आणि आफ्रिका खंडात गमावलेला प्रभाव मिळवण्याचा प्रयत्न आहे. भारत आणि चीन यांच्यात शांतता प्रस्थापित करून आशियात पुन्हा प्रभाव मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भारत-चीन वाद ही रशियासाठी मोठी संधी असल्याचेही जाणकार सांगत आहेत. समाजवादी सोव्हिएत युनियन रशियाचा आपल्या सत्ताकाळात जगभरात दबदबा होता. मात्र, १९९१ मध्ये सोव्हिएत युनियन रशियाचे पतन झाल्यानंतर रशियाच्या प्रभावालाही ओहोटी लागण्यास सुरुवात झाली होती.

दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ११ देशांची चर्चा आयोजित केली. रशियाला दूर ठेवून अमेरिकेच्या पुढाकाराने सुरू झालेली शांतता प्रक्रिया संपविणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते अशी चर्चा आहे. रशियाने आयोजित केलेल्या या चर्चेच्या यशस्वी आयोजनाने रशियन राजनयिकांना अधिक सामर्थ्य मिळाले.. या बैठकीला भारतानेही हजेरी लावली होती.

ग्रेटर युरेशिया बनवण्याचे पुतीन यांचे स्वप्न असल्याचे बोलले जात आहे. यातूनच रशियाची हरवलेली ताकद पुन्हा एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिकेऐवजी कोणत्याही वादाचे निराकरण करणार एक मजबूत देश म्हणून रशियाला आपली प्रतिमा बनवायची आहे.
============

Protected Content