भारत-चीन तणाव : नियंत्रण रेषेवर भारताकडून संघर्ष टाळण्याचा प्रयत्न-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली वृत्तसंस्था । संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीन तणावासंबंधी सरकारची भूमिका आज राज्यसभेत मांडली. पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

या वादावर चर्चेतूनच तोडगा काढायला हवा, हे भारताचं ठाम मत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या वरीष्ठ सभागृहात सांगितले.

सोबतच, चीनकडून दोन्ही देशांदरम्यान झालेल्या १९९३ आणि १९९६ साली झालेल्या करारांचं उल्लंघन झाल्याचंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. चीननं लडाखमध्ये जवळपास ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमिनीवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचाही पुनरुच्चार राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केलाय. ‘सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे द्विपक्षीय नात्यावरही परिणाम होणार, हे चीननं ध्यानात घ्यायला हवं’ असाही इशारा राजनाथ सिंह यांनी चीनला दिलाय.

चीनच्या बाता आणि कृत्य यात फरक असल्याचंही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत नमूद केलं. याचाच पुरावा म्हणजे चर्चा सुरू असतानाच चीनकडून २९-३० ऑगस्ट रोजी चिथावणीखोर कारवाई करण्यात आली.

यावेळी संरक्षण मंत्र्यांनी ‘साइनो-पाकिस्तान बाउंड्री अॅग्रीमेंट’चाही उल्लेख केला. या कराराद्वारे पाकिस्ताननं अवैधरित्या ५,१८० स्क्वेअर किलोमीटर भारतीय जमीन चीनला आंदण दिल्याचंही राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. चीननं अरुणाचल प्रदेशातही ९० हजार स्क्वेअर किलोमीटर भूमीवर दावा केल्याचंही संरक्षण मंत्री यांनी सांगितले.

Protected Content