जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील भारत गॅस कंपनीसमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सासू आणि जावई हे जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे नितीन संजय नाथ (वय-३०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नितीन नाथ हे सासू आशाबाई यांच्यासोबत दुचाकी (एमएच १९ एजी ६८४६) ने एमआयडीसीतील भारत गॅस कंपनीसमोरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहन (एमएच १८ बीजी ३५७५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत नितीन नाथ व त्यांची सासू आशाबाई हे जखमी झाले तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. दोघांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रविवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता नितीन नाथ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहे.