जळगाव, प्रतिनिधी । ‘गरज ही शोधाची जननी आहे’हे अगदी सार्थ ठरवत अर्चित राहुल पाटील या विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्याने स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रात एक नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे. या लिटल पॅडमॅनला प्रोत्सहान मिळावे यासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने त्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रसूती नंतर अतिरक्तस्त्रावामुळे मातेचे मृत्यूचे प्रमाण खूप मोठे असून ही बाब लक्षात घेता आठवीच्या विद्यार्थ्याने पीपीएच कप हे संयंत्र तयार केले आहे.भ विष्यात हे सयंत्र प्रसूतीवेळी महिलांसाठी एक वरदान ठरणार आहे. जळगावच्या या ‘लिटल पॅडमॅनच्या’ संशोधनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने त्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावामुळे जगात प्रत्येक चार मिनिटाला मातेचा मृत्यू होत आहे.ऐनवेळी रक्त मिळणे कठीण असते, परंतु अर्चितच्या पीपीएच कपमुळे रक्तस्रावाची मोजणी,लवकर निदान व महिलेवर उपचार शक्य होणार आहे.जळगावातील तीन रुग्णालयात दीड वर्षापासून याचा यशस्वीरीत्या वापर होत आहे असे अर्चितचे वडील डॉ.राहुल पाटील (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ) यांनी युवा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
आपल्या संशोधनाबाबत अधिक माहिती देतांना अर्चित म्हणाला की, पीपीएच कप पर्यावरणपूरक असून १५ ते २० वर्षे वापरता येऊ शकतो.त्यामुळे सॅनिटरी पॅडमुळे होणाऱ्या प्रदूषणाला देखील रोखले जाते.यासाठी अर्चितला अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.यावेळी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा प्रतीक्षा मनोज पाटील, जिल्हासचिव दिव्या यशवंत भोसले,अविनाश जावळे,जिल्हा समन्वयक धनश्री विवेक ठाकरे व इरफान पिंजारी हे उपस्थित होते.