भारतीय माध्यमे मोदींच्या पाळलेल्या कुत्र्याच्या भूमिकेत !

 

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था / माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भारतीय प्रसारमाध्यमे सरकारच्याच बाजूने बोलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सिन्हा यांनी आयोजित केलेल्या गांधी शांती यात्रेचा संदर्भ देत सिन्हा यांनी प्रसारमाध्यमे केवळ सरकारचा अजेंडा आणि धोरणे रेटण्याचं काम करत आहेत असं म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करताना, “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे,” असं म्हटलं आहे.

जानेवारीमध्ये सिन्हा यांनी भारतामधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत २२ दिवसांची गांधी शांती यात्रा केली होती. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवहीला विरोध करण्यासाठी सिन्हा यांनी काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबतीने ही यात्रा केली होती. मात्र या यात्रेला प्रसारमाध्यमांनी म्हणावे तितके महत्व दिले नाही अशी खंत सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.

“भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे. त्यामुळेच सध्या देशात वाईट परिस्थिती सध्या दिसून येत आहे. प्रसारमाध्यमे केवळ सरकारच्या इच्छेनुसार वागत आहेत असं नाही तर सरकारचा अजेंडा रेटण्यासाठी आणि सरकारला काय अपेक्षित आहे याचा अंदाज बांधून काम करत आहेत,” असा आरोप सिन्हा यांनी केला आहे.

केवळ प्रसारमाध्यमेच नाही तर हिंदुत्ववादी राष्ट्रवादाने न्याय व्यवस्थेबरोबरच इतर अनेक प्रभावशाली संस्थांवर वर्चस्व मिळवल्याचे चित्र दिसत आहे असं सिन्हा म्हणाले आहेत. भारतामध्ये फॅसिस्ट विचारसरणी वाढत आहे का या प्रश्नावर सिन्हा म्हणाले कि . “मागील सहा वर्षांमध्ये भारतामधील लोकशाही तत्वांचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात जाणीवपूर्वक पद्धतीने काम करण्यात आलं आहे असं मी म्हणेन. मात्र देशातील लोकांमध्ये याविरोधात लढण्याची शक्ती आणि क्षमता आहे,” असं सिन्हा म्हणाले.

भाजपमधून बाहेर पडलेले सिन्हा आता मोदी सरकारच्या सर्वात प्रमुख टीकाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. एकेकाळी सिन्हा दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय होते. अटलजींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिन्हा यांनी अर्थमंत्री तसेच परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं आहे. मात्र वैचारिक मतभेदांमुळे सिन्हा यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना दिसतात.
पंतप्रधान मोदींना वाजपेयी यांच्या काळातील सहकाऱ्यांबद्दल मोदींना फारसे प्रेम नाही “मोदींना केवळ स्वत:ची मते इतरांवर लादायची असतात. मात्र आमच्यापैकी काहीजण सहजपणे हे ऐकणार नाही हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांच्या मार्गातून बाजूला झालेलं बरं,” असा विचार करुन आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सिन्हा यांनी म्हटलं आहे.
मोदींचा पर्याय दिल्याचा पश्चाताप
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांआधी नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी इच्छा व्यक्त करणारे सिन्हा हे काही मोजक्या नेत्यांपैकी एक होते. मात्र आपल्या या भूमिकेचा आता पश्चाताप होत असल्याचे सिन्हा यांनी त्यांच्या, ‘इंडिया अनमेड: हाऊ द मोदी गव्हर्मेंट ब्रोक द इकनॉमी’ या पुस्तकामध्ये म्हटलं आहे.

Protected Content