नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात वेगाने होणारी रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरत असून जागतिक रुग्णसंख्येत मोठा वाटा उचलत आहे. भारतात सोमवारी ३ लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण तर २८१२ मृत्यूंची नोंद झाली. ही रुग्णसंख्या जागतिक उच्चांक गाठणारी आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात आरोग्य सुविधांचा तुटवडा असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील स्थितीवर भाष्य केलं आहे. भारतामधील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचं म्हटलं आहे. भारतात संकट गहिरं होत असतानाच जागतिक आऱोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर यांसाठी धावपळ करावी लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राह दिल्ली, कर्नाटक अशा अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले आहेत.
“जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे,” अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून २६०० तज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
टेड्रोस यांनी जगातील रुग्णसंख्या सलग नवव्या दिवशी वाढण्यावरुन चिंता व्यक्त केली. पाच महिन्यात जितके रुग्ण आढळले होते तितक्या रुग्णांची गेल्या एका आठवड्यात नोंद झाली असल्याचं सांगत त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं. सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
भारतात काही दिवसांपासून उच्चांक नोंदवणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत ४७.६७ टक्के रुग्ण हे पाच राज्यांमधील असून एकटा महाराष्ट्र १५.७ टक्के रुग्णसंख्येसाठी जबाबदार आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. २७७१ मृत्यूंसोबत मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण झालं आहे.
महाराष्ट्रात सोमवारी ७१ हजार ७३६ रूग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९२ एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात ४८ हजार ७०० नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत.सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ % आहे.