‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’मार्ग उल्लेख न केल्यास आंदोलन – भिमपुत्र गृपचा इशारा

फैजपूर, प्रतिनिधी | शहरातील सुभाष चौक ते बसस्थानक मार्गाचे फैजपूर नगरपालिकेने ठरावाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर केलेले असतांना प्रशासन व प्रसिद्धी माध्यमांद्वारे नाम उल्लेख हेतुपुरस्सर टाळला जात असल्याचा आरोप भिमपुत्र गृपच्या वतीने करण्यात आला आहे. यापुढे या मार्गाचा उल्लेख सर्वांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा करावा अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रसिद्धीपत्राद्वारे देण्यात आला आहे.

 

प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्राचा आशय असा की, फैजपुर नगरपालिकेने सन २०१२ मध्ये सर्व साधारण सभेमध्ये तत्कालीन नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन मुख्याधिकारी अनिल मधुकर वायकोळे यांच्या उपस्थितीत, अंकलेश्वर – बुऱ्हाणपूर रोडवरील फैजपुर शहरातील सुभाष चौक ते बसस्थानक मार्गाला, स्वतंत्र भारताचे भाग्यविधाते, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न. परम पुज्य, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला होता. तसेच नागरपालिकेतर्फे त्या मार्गाच्या नामांतराचा फलक पूर्वीचे छत्री चौक व आताचे स्व. बापु वाणी चौकात लावण्यात आलेला आहे. तरी सुद्धा प्रत्येक वेळी त्या मार्गाला सुभाष चौक ते बसस्थानक असे वारंवार संबोधले जाते. त्या मार्गाचे नामांतर करून सुद्धा फैजपुर शहरातील पत्रकार बंधु व पालिका प्रशासन पेपरमध्ये बातमी देतांना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामोल्लेख नकरता, सुभाष चौक ते बसस्थानक असा नामोल्लेख करतांना दिसत आहे, तरी अशा वारंवार होत असलेल्या नामोल्लेखनाने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असुन या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, यापुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असाच उल्लेख केला गेला पाहिजे, अन्यथा भिमपुत्र ग्रुप व भिम अनुयायी फैजपुर शहारातर्फे जनआंदोलन छेडले जाईल. व डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा नामोल्लेख न करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा भिमपुत्र ग्रुप फैजपूर शहर अध्यक्ष पप्पु मेढे यांनी दिला आहे.

Protected Content