जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | खोली खाली करण्याच्या कारणावरून भाडेकरूला लोखंडी पाईपाने मारहाण करून दुखापत करणाऱ्या घरमालकाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल भानूदास चव्हाण (वय-३३) रा. रायपूर कुसुंबा ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रायपूर कुसुंबा येथील मनुसिंग उर्फ मनोज चावदस परदेशी (वय-३०) यांच्या घरात भाड्याने राहतात. रविवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मनोज परदेशी याने अनिल चव्हाण याला खोली खाली करण्याचे सांगितले. दरम्यान, अनिलने खोली खाली करण्यास नकार दिल्याने मनोज परदेशी याने अनिलला शिवीगाळ करून लोखंडी पाईपाने चेहऱ्यावर मारहाण केली. या अनिल हा जखमी झाला आहे. तसेच तू कसे खोली खाली करत नाही ते मी बघतो अशी दमदाटी करून गटारीत ढकलून दिले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मनोज परदेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, गफार तडवी, सिद्धेश्वर दापकर यांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपी मनोज परदेशी याला कुसुंबा गावातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे.