मुंबई प्रतिनिधी | ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व देवेंद्र फडणवीस हेच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आज खापर फोडणारे फडणवीस पाच वर्ष गप्प का बसले होते? असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धक्का देऊन ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्याने पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. तर आता याला महाविकास आघाडीतर्फे उत्तर दिले जात आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून फडणवीसांवर पलटवार केला आहे.
या संदर्भा नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारकडे असलेला डेटा जाणीवपूर्वक दिला गेला नाही. भारतीय जनता पक्ष व केंद्र सरकारने राज्य सरकारची अडवणूक केली. मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार डेटा गोळा करण्याचे काम तात्काळ म्हणजे आजपासूनच सुरु केली पाहिजे. त्यासाठी जी काही संसाधने लागतील ती राज्य सरकारने पुरवली पाहिजेत. आता वेळ घालवणे योग्य नाही. कॉंग्रेस पक्ष ओबीसींचे आरक्षण टिकावे यासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणा तात्काळ कामाला लावावी. जो वेळ जात आहे त्यापाठीमागे कोण आहेत? झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? याची माहिती आम्ही लवकरच उघड करु.
पटोले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडील डेटा अशुद्ध होता तर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारमधील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे सरकार असताना तो डेटा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार का केला होता, हे स्पष्ट केले पाहिजे. ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व देवेंद्र फडणवीस हेच आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आज खापर फोडणारे फडणवीस पाच वर्ष गप्प का बसले होते? मी विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसींची जनगणना करावी असा ठराव सभागृहात मंजूर करुन घेतला होता. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र अशी जनगणना करणार नाही भूमिका घेतली. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षण संपुष्टात आणण्यासाठीच काम करत आहे हे उघड आहे. आम्हाला यावर राजकारण करायचे नाही परंतु कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळावे यासाठी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले.