पिंपरी (वृत्तसंस्था) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलतोय. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख द्यावेत. तसेच पैसे न दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीला आज (गुरुवार) पहाटे पुण्यातून निगडी पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ संतोष अस्तूर (वय ३१) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सौरभ अस्तूरने फोन करून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख द्या. पैसे देण्यासाठी पर्वती येथील एका कार्यकर्त्याला पाठवतो, असे रुग्णालयात फोन करून सांगितले होते. १८ जुलै रोजी हा फोन आला होता. फोन येताच रुग्णालय प्रशासनाने चंद्रकांत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांच्या नावाचा अज्ञातांनी वापर केल्याचा समोर आले. मी कोणत्याही पैशांची मागणी केलेली नाही. तुम्ही संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा, अशी सूचना चंद्रकांत पाटील केली. त्यानंतर निगडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्याला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरु आहे. तत्पूर्वी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे येरवडा येथील एकाला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याचा फोन चोरीस गेल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्या मोबाइल चोराची माहिती मिळविली आणि खऱ्या आरोपीला अटक केली.