मुंबई : वृत्तसंस्था । “एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का? ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरु आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्याने पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्याचबरोबर काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विटवर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यावर पटोले यांनी टीका केली होती. याशिवाय अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. त्याचबरोबर त्यांचे शूटिंगही बंद पाडू, असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. त्यांच्या या इशाऱ्यावर फडणवीसांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता फडणवीसांच्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
“सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे”, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं.
नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना लगावला होता.