अहमदनगर (वृत्तसंस्था) तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्याने थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अॅड. दिनकर पालवे यांनी नोटीस पाठवली आहे. एवढेच नव्हे तर, नोटीसी दखल न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरून थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वकिलामार्फत नोटीस पाठवण्याचा प्रकार देशात पहिल्यांदा घडला आहे. भाजपची पाथर्डी येथील तालुका कार्यकारिणीची निवड १९ जुलै रोजी करण्यात आली. परंतु ही निवड पक्षाच्या घटनेच्या विरोधात असल्याचा आक्षेप घेत एका गटाने थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस पाठवली आहे. कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. ही नोटीस नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पाथर्डीचे मंडल अध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डी-शेवगाव मतदार संघाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाही देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारिणीच्या स्थापनेनंतर पहिली बैठक दोनच दिवसांपूर्वी पार पडली. त्यात प्रमुख कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत १२ प्रदेश उपाध्यक्ष, १२ सेक्रेटरी, ६ जनरल सेक्रेटरी आणि १ कोषाध्यक्षाची निवड करण्यात आली होती.