भाजप आपला चेहरा स्वत:च ओरबाडतेय : शिवसेना

Uddhav Thackeray Devendra Fadnavis

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे २०१९ सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. २०१४ साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपट्याचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधला आहे.

 

 

अग्रलेखात म्हटले आहे की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने फारशी खळबळ होण्याचे कारण नव्हते. शिवसेना वा राष्ट्रवादीने त्यांचे हे वक्तव्य गांभीर्याने घेतले नाही. पण फडणवीस दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा प्रयत्न करीत होते. चव्हाण काय बोलले यात आम्हाला पडायचे नाही. पण यानिमित्ताने भाजप आपला चेहरा स्वत:च ओरबाडत आहे. २०१४ साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि २५ वर्षांच्या नात्याचा विचार न करता भाजपनं निर्घृण पद्धतीनं शिवसेनेशी असलेली युती तोडली. त्यातून भाजपचा पहिला मुखवटा उतरला, पण त्यानंतरही खरा चेहरा बाहेर आला नाही. कारण त्यांचं एका मुखवट्यावर भागत नाही. २०१४ साली हे नाट्य घडत असताना शिवसेनेने चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती. मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच होते. घोडेबाजारात मशहूर असलेले भाजपवाले साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तोडफोड करायला तयार होते. फडणवीस यांनी आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. २०१४ साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content