मुंबई लाइव्ह ट्रेंड्स वृत्तसेवा – उत्तर प्रदेश तसेच अन्य राज्यात भाजपाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. या निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होत आहे. विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार असून याबाबत युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद शरद पवारांनी स्वीकारावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान देशातील तरुणांनी एकजूट होणं गरजेचे असून काश्मिरी पंडितांना मदत करण्याऐवजी त्याचा राजकीय फायदा करून दुरुपयोग करणाऱ्या विरोधात युवा शक्ती सामना करु शकते,” असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
देशात भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर पर्यायी आघाडी उभी करण्यासंबंधी पुन्हा एकदा दिल्लीत चर्चा सुरु झाली असून नवी दिल्ली येथे मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी यूपीएचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा ठराव मांडून संमत देखील झाला आहे. एकीकडे काँग्रेसमध्ये नेतृत्व वाद सुरु आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वाची कमान द्यावी याबाबत विचार मंथन केले जात आहे.
देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार हेच राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करू शकतात, काँग्रेस मधील कोणीच युपीए चे नेतृत्व करु शकत नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधून सूर आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखणे शक्य आहे असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते असून कृषी आणि संरक्षण मंत्री पदाचा अनुभव असून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व दिले जावे असे ठरावात म्हटले आहे. त्यामुळे भारतीय काँग्रेससह अन्य युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
गांधी, नेहरु, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाला एक नवी दिशा दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ विचारसरचणी एकच परंतु फक्त काम करण्याची पद्धत वेगळी असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यानी म्हटले आहे.