भाजपा नेत्यांच्या घरातील आंतरधर्मिय विवाह ‘लव्ह जिहाद’ आहेत का?

 

रायपूर : वृत्तसंस्था । छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा नेत्यांच्या घरातील आंतरधर्मिय विवाह ‘लव्ह जिहाद’ आहेत का? , असेही ते म्हणाले

भाजपाशासित राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा बनवण्याच्या हलचाली सुरु असल्यासंदर्भात भाष्य करताना बघेल यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला. पक्षातील नेत्यांच्या कुटुंबियांमध्ये झालेले आंतरधर्मिय विवाह हे सुद्धा बळजबरीने केलेलं धर्मांतर आहे का?, असा सवाल बघेल यांनी भाजपाच्या नेत्यांना केला आहे.

भाजपाची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आसाममध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा बनवण्यासंदर्भातील हलचाली सुरु झाल्या आहेत. लव्ह जिहाद हा शब्द हिंदुत्ववादी संघटनांद्वारे आंतर-धार्मिक विवाहासाठी वापरला जातो. मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी बळजबरीने किंवा छळ करून स्त्रीयांचे धर्मांतरण होते. महिलांना धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याचा दावा केला जातो.
केरळ आणि कर्नाटकमध्ये हिंदू मुलींनी मुस्लिम तरुणांशी लग्न केल्याचे प्रकार काही वर्षापूर्वी समोर आले तेव्हा लव्ह जिहादचा वापर पहिल्यांदा करण्यात आला होता. ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला कायद्यात कोणतीही स्थान नसून आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांकडून एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती, केंद्र सरकारतर्फे याच वर्षी फ्रेब्रुवारी महिन्यात देण्यात आली होती.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही २० नोव्हेंबर रोजी भाजपाच्या लव्ह जिहादसंदर्भातील भूमिकेवर टीका केली होती. भाजपाकडून देशामध्ये फूट पाडण्याचा आणि देशातील एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे असं गेहलोत यांनी म्हटलं होतं. अशाप्रकारचा कायदा करणं हे भारतीय कायद्याने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं आहे. संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या आवडीचा कोणत्या धर्माचा आणि जातीचा जोडीदार निवडण्याची मूभा आहे. लग्न हा खासगी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, असंही गेहलोत म्हणाले होते. लव्ह जिहाद ही संकल्पनाच कायद्याच्या विरोधात आहे. कोणत्याही न्यायालयामध्ये हा कायदा टीकणार नाही असं सांगताना गेहलोत यांनी, “प्रेमात जिहादला काहीच स्थान नाहीय,” असंही म्हटलं होतं.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी , हरियाणामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यावर विचार सुरू आहे, असं नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आमचे सरकार लव्ह जिहाद संपुष्टात आणण्यासाठी कडक पावलं उचलणार आहे, असं म्हटलं होतं. १७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहोत. असं स्पष्ट केलं होतं.

ऑक्टोबर महिन्यामध्येच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद बद्दल चिंता व्यक्त केली होती. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल. असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला होता.

Protected Content