मुंबई : वृत्तसंस्था । भाजपाकडून होत असलेल्या राजकीय शाब्दिक हल्ल्यांना काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं असून, “आम्ही तोंड उघडले तर भाजपाची पळता भुई थोडी होईल,” असा इशारा भाजपाला दिला आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा असा कलगीतुरा सध्या रंगलेला आहे. अंबानी प्रकरणापासून आक्रमक झालेल्या भाजपाचा रोख कायम असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून सातत्याने ठाकरे सरकारविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.
भाजपाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बदल्यांसाठी पैसे घेणारं रॅकेट सक्रिय होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली. दुसरीकडे काँग्रेसनंही राज्यातील राजकीय परिस्थितीवर विचारमंथन केलं. त्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
“काँग्रेस नेत्यांनी काल राज्यातील एकंदर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपाची सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेली थेरं आम्ही पाहत आहोत. संवैधानिक पदांचा दुरुपयोग व संवैधानिक मर्यादांचे उल्लंघन केलं जात आहे. यावर आमचं लक्ष आहे. भाजपाच्या षडयंत्राची आम्हाला माहिती आहे,” असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
“फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते. पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले, तर भाजपाची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच! त्या वेळेची वाट पहावी,” असा इशाराही सावंत यांनी भाजपाला दिला आहे