मुंबई-भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकारिणीची बैठक पक्ष मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, आमदार अमिन पटेल, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, AICC चे समन्वयक खान, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, इब्राहिम भाईजान यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते बोलत बोलत होते, या बैठकीला मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून भाजपा सरकार काम करत आहे. जाती धर्माच्या नावावर भाजपा राजकारण करत आहे पण देशातील जनतेला भाजपाचा हा ढोंगी चेहरा समजला आहे. कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत भाजपाने हिजाबसारखे विविध धार्मिक मुद्दे उकरून काढले. पण ज्या नेत्यांनी धार्मिक मुद्द्यांवर भर दिला त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. कर्नाटकच्या जनतेने भाजपाचे धर्मांध राजकारण चालू दिले नाही. डबल इंजनच्या सरकारवर भाजपा भर देत होते पण मणिपूरमध्ये डबल इंजिनचेच सरकार आहे, तिथे आज काय परिस्थिती आहे हे आपण पहातच आहोत. मणिपूर जळत आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिकडे पाहण्यासही वेळ नाही.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या व या निवडणुकीने देशात डबल इंजिनची गरज नाही हे दाखवून दिले. डबल इंजिनची गरज तेव्हाच पडते जेव्हा एक इंजिन बंद पडते परंतु काँग्रेसकडे एकच भक्कम व ताकदवान इंजिन आहे आणि ते म्हणजे राहुल गांधी. देशाचे पंतप्रधान कर्नाटकच्या गल्ली-बोळात फिरले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो. एमआयएम व बीआरएस हे दोन पक्ष महाराष्ट्रात मतविभाजनाचे काम करतात व त्याचा थेट फायदा भाजपाला होतो. काँग्रेसला सत्तेत आणण्यासाटी अल्पसंख्याक समाजाने एकजुटीने काँग्रेसच्या मागे उभे रहावे, असे अवाहनही चव्हाण यांनी केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, महाराष्ट्रात संभाजीनगर, अकोलासह काही भागात दोन धर्मात द्वेष पसरवून वातावरण अशांत करण्याचे काम केले गेले पण आपण सर्वांनी समजूतदारपणे परिस्थिती हाताळली. समाजात विष पेरण्याचे काम आरएसएस व भाजपा करत असताना राहुल गांधी मात्र मोठ्या धैर्याने त्यांचा मुकाबला करत आहेत.राहुल गांधी यांनी ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ सुरु करण्याचे चांगले काम केले आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत हिजाब, हलाल, सारखे धार्मिक मुद्दे आणले त्याने काम होत नाही हे दिसताच ‘केरला स्टोरी’ आणली. देशाचे पंतप्रधान जे विश्वगुरु म्हणवतात त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन केले पण जनतेने त्यांचा हा डावही हाणून पाडला.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सर्व जाती धर्माच्या प्रमुख व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणा व एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम राबवा मग कोणतीही धर्मांध शक्ती तुमचे काहीच करु शकणार नाही.त्यांनी रस्त्यावर ‘काटे पेरले तर तुम्ही फुलांचा सडा टाका’आणि भाजपाच्या षडयंत्राला बळी पडू नका, असे आवाहन नसीम खान यांनी केले.