भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी-सावंत

 

 

मुंबई : प्रतिनिधी । महाराष्ट्राची बदनामी करणारी कंगना राणावत हिचा खोटेपणा उघड झाला असून यामुळे तिची पाठराखण करणार्‍या भारतीय जनता पक्षाने राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

कंगना राणावतच्या एका जुन्या व्हिडीओला ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, कंगणाने स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देणारा एक व्हीडिओ अनेक महिन्यांपासून व्हायरल झालेला आहे, तिचा एक मित्र अद्ययन सुमन यांनीही कंगणा ड्रग घेण्यास भाग पाडत होती असे सांगितले होते तोही व्हिडिओ जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील ड्रग संदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ असेही कंगणाने जाहीरपणे सांगितले होते. असे असताना एनसीबी त्याकडे गांभिर्याने का पहात नाही आणि तिला चौकशीसाठी का बोलावत नाही. कंगणाला मोदी सरकारने पुरवलेली वाय दर्जाची सुरक्षा आजही तिला आहे. या सुरक्षेचा खर्च जनतेच्या पैशातून होतो, तो वाया जात आहे.

कंगणाची पाठराखण करणारे भारतीय जनता पक्षाचे लोकही याविषयावर आता गप्प आहेत. राम कदम यांनी कंगणाची तुलना झाशीच्या राणीशी केली होती. ड्रग संदर्भात कंगणाकडील माहिती बाहेर आल्यास अनेकांचे पितळ उघडे पडेल म्हणून महाविकास आघाडी सरकार ती माहिती उघड होऊ देत नाही असा आरोपही राम कदम यांनी केला होता. एवढी महत्वाची माहिती दडवणे हाही गुन्हाच आहे. त्यामुळे राम कदम यांनी कंगणाला तिच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देण्यास सांगावे. या संपूर्ण प्रकरणात भाजपाने कंगणाला साथ देत महाराष्ट्राची बदनामी केली. कंगणाचा बोलवता धनी भाजपा आहे हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करणार्‍या भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे,असेही सावंत म्हणाले.

Protected Content