मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात ५ तारखेनंतर कोरोनाचा भडका उडाला तर सुपरस्प्रेडर भाजपा जबाबदार असेल.” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
५ जून रोजी सुपरस्प्रेडर भाजपा आंदोलन करत आहे व कोरोनाच्या संकटात जनतेचा जीव स्वार्थी राजकारणासाठी धोक्यात घालत आहे. भाजपाचे बेजबाबदार वर्तन देशात करोनाच्या हाहाकाराला आधीच कारणीभूत ठरले आहे असेही ते म्हणाले .
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपावर निशाणा साधताना सचिन सावंत म्हणाले की, “एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे.”
“मराठा समाजाने कोल्हापूरला ज्या संस्थेविरोधात आंदोलन केले त्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संस्थेची स्थापना भाजपाच्या इशाऱ्यावर नागपूर येथे २०१९/२० करण्यात आली का? या संस्थेचे विश्वस्त नागपूरचे असून भाजपा आणि संघाशी संबंधित आहेत.” असं देखील सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.
कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांनी व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू.” असं सचिन सावंत यांनी काल ट्विटद्वारे म्हटलं होतं.
बीड येथून शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे ५ जून रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “विनायक मेटे ५ तारखेला काढत असलेल्या मोर्चात आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा किंवा बॅच घेऊन सहभागी होणार नाही. पण एक नागरिक म्हणून पक्षातील सर्वजण सहभागी होणार आहोत.”