जळगाव, प्रतिनिधी । राजेंद्र घुगे पाटील यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड झाल्यानंतर लगेच सत्ताधारी भाजपच्या नाराज नगरसेवकांनी वेगळी बैठक आज झाल्याची चर्चा होती. राज्यभर गाजत असलेल्या नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या संदर्भाने आणि पार्श्वभूमीवरही या बैठकीबद्दल शहराच्या राजकारणात उत्सुकता ताणली गेली होती.
स्थायी समिती सभापतीपदासाठी राजेंद्र घुगे पाटील, ललित कोल्हे व नवनाथ दारकुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांचा फोन आल्याने राजेंद्र घुगे पाटील यांचा एकमेव अर्ज स्थायी समिती सभापतीसाठी काल दाखल करण्यात आला होता. तर आज शिवसेनेचे सभापती पदाचे उमेदवर नितीन बरडे यांनी देखील माघार घेतल्याने राजेंद्र घुगे पाटील हे बिनविरोध निवडून आलेत. यात माजी महापौर ललित कोल्हे हे स्थायी सभापतीपदासाठी आग्रही होते. यासाठी त्यांनी बरेच प्रयन्त केले मात्र, श्री. कोल्हे, व श्री. दारकुंडे यांना डावलून राजेंद्र घुगे पाटील यांना सभापती बनविण्यात आले. याकारणाने ललित कोल्हे गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराज गटामध्ये समेट घडवून आणण्यासाठी शहरातील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक आयोजित करण्यात आल्याची चर्चा आहे. या बैठकीला कैलास आप्पा सोनवणे गटातील भगत बालाणी, किशोर चौधरी, सचिन पाटील, कुलभूषण पाटील, मुकुंद सोनवणे, मनोज आहुजा आदी उपस्थित होते. हा गट जेव्हा हॉटेलच्या बाहेर पडला तेव्हा त्यांच्याकडे महापालिका अधिनियम चे पुस्तक होते.