मुंबई : वृत्तसंस्था । भाजपकडून आज विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवण्यात आली. या प्रतिविधानसभेत सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला.
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. या कारवाईचे पडसाद आज विधानसभेत आणि सभागृहाबाहेर पडसाद उमटले. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं.
भाजपाने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवला. प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर मलिक यांनी पाठिंबा देत काही विषय मांडले. अधिकार नसताना माजी आमदार यात कसे सहभागी होत आहे. काल झालेल्या गदारोळावेळी आम्ही मार्शलला बोलवलं, पण कुणीही आलं नाही. या सभागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारावा, अशी मागणी मलिक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्पीकर वापरण्यासंदर्भात परवानगी दिलेली नाही. तसेच बाहेर जे बोललं जात आहे, तेही तपासून घेतलं जाईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. तसंच प्रतिविधानसभेत वाटल्या जाणारे कागद वाटणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही अध्यक्षांनी दिले.
प्रतिविधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. “शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, विद्यार्थी, एमपीएससी, विम्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला, तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केलं जातंय… जे घडलंच नाही; ते घडलं आहे, असं सांगून धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून आमदारांना निलंबित केलं जातं म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो आहे,” असं फडणवीस म्हणाले.
१२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या भाजपाने आज आंदोलन सुरू केलं आहे. भाजपाने सभागृहाबाहेरचं भाजपाने प्रतिविधानसभा भरवली. भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत सरकारच्या विरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला. फडणवीस यांनी यांनी हा प्रस्ताव मांडला.