भाजपकडे घोडेबाजारी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध ; अमित शहांवर कॉंग्रेसची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपकडे सामान्य लोकांना कोविड १९ च्या संकटातून वाचवण्यासाठी निधी उपलब्ध नाही. परंतू घोडेबाजारी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध आहे. राजस्थानमध्ये भाजपाकडून घोडेबाजारी होत असून आमदारांना खरेदी करण्यासाठी कोट्यवधीच्या ऑफर दिल्या जात असल्याबाबत काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांवर आमदार खरेदीचा आरोप केला आहे.

 

काँग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे की, सत्तेच्या भुकेपोटी भाजपा देशातील लोकशाही परंपरेचा अपमान करत आहे, आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपाचा स्वभाव बनला आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर येथे हॉर्स ट्रेडिंग, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथे लोकशाहीचा अपमान, तर गुजरात, राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न अशा शब्दात काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपकडे सामान्य लोकांना कोविड १९ च्या संकटातून वाचवण्यासाठी निधी उपलब्ध नाही. परंतू घोडेबाजारी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध आहे, असे सांगत एक फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लक्ष्य करण्यात आले आहे. तेथे Amit Shah’s MLA Shopping List असे लिहिले असून त्यात मध्य प्रदेश – २२, कर्नाटक -१६, गोवा – १३, मणिपूर ८, आसाम – ९ अशा विरोधी पक्षातून घेतलेल्या आमदारांची आकडेवारी सांगण्यात आली आहे.

Protected Content