जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ममुराबाद रोडवर ॲपेरिक्षाचे जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात रिक्षा चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन कमलाकर पाटील (वय-२०) रा. पिळोदा ता. यावल हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नितीन पाटील हा दुचाकी (एमएच १९ डीयू ९०६४) ने जळगावहून ममुराबाद मार्गे पिळोदा येथे जात असतांना समोरून येणारी ॲपे रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ५०५७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार नितीन पाटील हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर ॲपेरिक्षा चालक वाहन घेवून घटनास्थळाहून पसार झाला होता. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनी तातडीने मदतकार्य करून जखमी तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ॲपेरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.