जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर येथे भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात आयशर चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान विठ्ठल साबळे (वय-४४) रा. विटनेर ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, सोपान साबळे हे आपल्या पत्नी व मुलांसह जळगाव तालुक्यातील विटनेर येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी ते शेतात दुचाकीने गेले होते. दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाले. दरम्यान जळके ते विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोपान साबळे यांचा मृत्यू झाला. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. याबाबत बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी वंदना, मुलगा किरण, आश्विनी आणि सोनाली या दोन मुली असा परिवार आहे.