यावल प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथे तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या तरूणाने अत्याचार केल्याचा अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील दहिगाव येथे काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान भाडेकराच्या तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दहीगाव येथे एक मजूर कुटुंब आपल्या एक मुलगा आणि एक मुलीसह राहते. ते एका घरात भाड्याने राहत असून घर मालकाचा मुलगा कैलास प्रल्हाद पाटील (वय२५) याने काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान, त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दहा रूपये देण्याचे आमीष दाखवून घरात नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. बालिकेची आई घरी आली असता तिला हा सर्व प्रकार समजला. तिने कैलासच्या कानशिलात लगावली असता तो तेथून पळून गेला.
दरम्यान, या प्रकारामुळे संबंधीत कुटुंबाला भयंकर धक्का बसला असून त्यांनी आज यावल पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार कैलास प्रल्हाद पाटील (वय२५, रा. दहीगाव, ता. यावल) याच्या विरूध्द भादंवि कलम ३७६, ३७६-अ, ३७५, ३५४, तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३, ४ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या आदेशावरून पोलीस हेड कॉस्टेबल अस्लम खान यांनी दहिगाव येथे जावुन आरोपी हा पळवुन जाण्याच्या बेतात असतांना त्यास अटक करण्यात आली आहे . या कामी त्यांना दहीगाव येथील गृहरक्षक दलाचे जनार्दन महाजन यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद मधुकर खांडबहाले हे करीत आहेत.