जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे देवीच्या भंडाऱ्यातील पंगतीत बसल्याच्या कारणावरून महिलांना उठवून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी या मागणीसाठी पिडीत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला बसले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे देवीच्या भंडारासाठी दवंडी देऊन जेवणासाठी गावातील सर्वांना बोलवण्यात आले होते. या अनुषंगाने १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता गावातील इतर समाज बांधव व महिला जेवणासाठी आल्या होत्या. त्यावेळी महिला जेवणासाठी बसले असता गावातील भुवन प्रकाश पाटील, नंदलाल गोकुळ पाटील, भिका रामसिंग पाटील, जयेश चंपालाल पाटील आणि मृणाल भुवन पाटील यांनी पंगतीत बसल्याच्या कारणावरून महिलांना व पुरूषांना बेदम मारहाण केली. याप्रकरणात पीडित महिलांनीह जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती.
परंतु जळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दमदाटी करून त्यांना घरी पाठवले. पोलीस कर्मचारी हे मारेकऱ्यांना पाठीशी घालत आहे. असा आरोप करत मारेकऱ्यांना अटक करण्यात या मागणीसाठी पिडीत महिलांना बुधवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या उपोषणात अनिता पवार, मंगला गायकवाड, मंगला मोरे यांच्यासह आदी महिलांना आमरण उपोषणात सहभाग नोंदविला आहे.