जळगाव प्रतिनिधी । आज दुपारी साडेचारच्या सुमारास शिरसोलीजवळ कामयानी एक्सप्रेसचे डबे घसरल्याचे वृत्त येताच खळबळ उडाली. तथापि, हे मॉक ड्रील असल्याचे तासाभरात समोर येताच अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, ०१०७२ अप कामयानी एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईकडे जात असतांना शिरसोली व म्हसावदच्या दरम्यान या ट्रेनचे तीन डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातामध्ये नेमकी किती हानी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या जनसंपर्क अधिकार्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा अपघात अप लाईन खंबा क्रमांक ४०३/२३ जवळ घडली आहे.
या संदर्भात माहिती मिळताच रेल्वे प्रशासनातील उच्च अधिकार्यांनी अपघातस्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, ही कोविड स्पेशल ट्रेन असून यात एफ. आय. खान हे गार्ड होते. त्यांनीच अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली असून भुसावळ येथून अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत;असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली होती.
दरम्यान, सुमारे एक तासानंतर रेल्वे प्रशासनाने हे वृत्त मॉक ड्रील या प्रकारातील असल्याचे जाहीर केले. रेल्वे प्रशासन हे किती सतर्क आहे याची तपासणी करण्यासाठी हे मॉक ड्रील करण्यात आल्याची माहिती भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.