पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पुण्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे ७३ व्या वर्षी प्रकृती खालावल्याने पुण्यात उपचारादरम्यान प्राणज्योत मालविल्याची माहितीसमोर आली आहे. सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अशी माहिती जगदीश मुळी यांनी दिली आहे.
ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले आहे. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.