ब्रेकींग : गिरणा नदीवरील नवीन समांतर पुलास मंजुरी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर गिरणा नदीवरील पुलास समांतर असणार्‍या बांभोरी आणि निमखेडीच्या दरम्यानच्या नवीन बंधारा कम पुलास आज राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची मंजुरी मिळाली आहे.

 

राष्ट्रीय महामार्गावरून जळगाव आणि धरणगाव तालुक्याला जोडणार्‍या गिरणा नदीवरील पुलास समांतर असणार्‍या बांभोरी आणि निमखेडीच्या दरम्यानच्या नवीन बंधारा कम पुलास आज राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ६ ला लागून असणार्‍या बांभोरी-निमखेडी-जळगाव-आसोदा-भादली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५९ वरील ४/५०० किलोमीटरवर सार्वजनीक बांधकाम खात्याच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या या पुलामुळे महामार्गावरील एकमेव पुलावर होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीला आळा बसण्यासाठी उपयोग होणार असून सोबत वाळूच्या उत्खननालाही चाप बसणार आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा पूल मंजूर करून आणला असून याला राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी देखील मिळणार असल्याने लवकरच याचे काम मार्गी लागणार आहे. यासोबत जिल्ह्यातील विविध मोठ्या प्रकल्पांच्या शेकडो कोटींच्या कामांना सुध्दा अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. लवकरच जुन्या हायवेच्या ठिकाणी याचे काम सुरू होणार आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी, यातून होणारे अपघात आणि एकंदरीतच त्रास दूर व्हावा यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी  बांभोरी ते निमखेडीच्या दरम्यान गिरणा नदीवर ४० कोटी निधीचा बंधारायुक्त समांतर पूल बांधण्याच्या कामाचा पाठपुरावा सुरू केला होता. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर  जळगाव शहर ते बांभोरी गाव यांना जोडणारा गिरणा नदीवर एकच पूल आहे. दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे विस्तारीकरण झाले असले तरी पुल हा अरूंद असल्याने येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे येथे नवीन पूल हवा ही मागणी कधीपासूनच करण्यात येत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या पुलासोबत बंधारादेखील हवा अशी संकल्पना मांडली. यातून गिरणेवर बंधारायुक्त पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.

 

याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे  शासनाकडे सादर करण्यात आला  होता. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही तत्कालीन सार्वजनीक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी दिली होती. दरम्यान, आज अर्थसंकल्पातील निधीच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ला लागून असणार्‍या बांभोरी-निमखेडी-जळगाव-आसोदा-भादली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५९ वरील ४/५०० किलोमीटरवर सदर पुलाचे बांधकाम करण्यासाठी ४० कोटी रूपयांचा पुलास प्रशासकीय मान्यतेस मंजूरी देण्यात आली आहे.

 

गिरणा नदीवरील हा नवीन पूल बांभोरी गाव आणि निमखेडी परिसर यांना जोडणार आहे. यामुळे जुन्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. परिणामी येथील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. यासोबत, बांभोरी आणि निमखेडी परिसरातील लोकांना मुख्य पुलावर न येता सुरक्षितपणे गिरणा नदी पार करता येईल. या पुलावरून परिसरातील नागरिक आणि विशेष करून विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असून या नवीन पुलामुळे त्यांना सुरक्षितता मिळणार आहे. विद्यापीठासह परिसराला नेहमी पाण्याची समस्या भेडसावत असते. या पार्श्‍वभूमिवर, गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी साठविण्यात आल्याने विद्यापीठासह परिसराचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे. गिरणा नदीच्या खालील भागात एकही बंधारा नसल्यामुळे येथून वाहून जाणारे पाणी येथे साठविले जाणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे कायम पाणीसाठा असल्याने या परिसरातून होणार्या वाळू उत्खननाला आळा बसणार आहे.

 

*पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दूरदृष्टीकोन आणि भगिरथ प्रयत्नांमुळे गिरणा नदीवरील बंधारायुक्त पुलामुळे वाहतुकीच्या सुविधेसह जलसंचय देखील होणार असून हा या भागातील मोठा व महत्वाचा असा प्रकल्प ठरणार आहे. आता याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामासाठी सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत यांनी प्रस्ताव सादर करून याला गती देण्याचे काम केले.

Protected Content