जळगाव दुचाकीवरुन गांजाची तस्करी करणार्यावर विशेष पोलीस महानिरक्षक व तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाकडून शनिवारी १७ जून रोजी रात्रीच्या सुमारास भोकर ते गढोदा दरम्यान कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे ६ लाख ६० हजारांचा सुमारे ६५ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गांजाची तस्करी करणारा मुन्ना सतीलाल पावरा (वय-३२, रा. मालापुर पो. विरवाडे ता. चोपडा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद् तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपुर येथून दुचाकीवरुन गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकातील पथकाला मिळाली. त्यांनी लागलीच तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांना दिली. तालुका पोलिसांसह विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने भोकर गावाजवळून भोकर ते गढोदा मार्गे धरणगावकडे जाणार्या रस्त्यावर सापळा रचला. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास (एमएच १९ टी २१३०) क्रमांकाच्या दुचाकीवरुन संशयित मुन्ना सतीलाल पावरा हा तरुण पांढर्या रंगाच्या गोणीत गांजाची तस्करी करीत होता. पथकाने धाड टाकून त्याची तपासणी केली असता, त्यांना तीन गोण्यांमध्ये सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचा ६५ किलो गांजा मिळून आला. याप्रकरणी मुन्ना पावरा याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.