मुंबई प्रतिनिधी | राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी ३० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असल्याचे आज राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले असून यात जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीचा समावेश आहे.
राज्यभरातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८८, डिसेंबर २०२१ मध्ये मुदत समाप्त होणार्या १८ आणि ७ नवनिर्मित अशा एकूण ११३ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
याच्या अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलेल्या नगरपंचायतींच्या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील बोदवड या नगरपंचायतीचा देखील समावेश आहे. यामुळे बोदवड नगरपंचायतीसाठी ३० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.