चाळीसगाव: प्रतिनिधी । उन्हाचे चटके तीव्र होऊ लागल्याने पाण्याची भिषण टंचाईही जाणवू लागली आहे. पाण्याच्या अभावामुळे वन्यजीवांचे हाल लक्षात येताच वनविभागाने टॅंकरच्या साहाय्याने अभयारण्य क्षेत्रातील पाणवठ्यात आज पाणी पुरवठा करून माणुसकीचा संदेश दिला.
सध्या उन्हाचे चटके तीव्र स्वरूपात जाणवू लागले आहेत. औट्रम घाट वनपरिक्षेत्रात मुबलक प्रमाणात जलसाठा नसल्याने वन्यजीवांचे हाल होत आहेत. विभागीय वनाधिकारी सातपुते (औरंगाबाद), एस. पी. काळे (वनसंरक्षक कन्नड) व वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डी.चव्हाण (चाळिसगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला.
या अभयारण्य क्षेत्रात एकूण १९ पाणवठे आहेत. त्यातील वन परिमंडळ बोढरे नियत क्षेत्र क्र. ३०७ मंध्ये पाणी पुरवठा करण्यात आला . यावेळी वन परिमंडळ अधिकारी डी. एस. जाधव (बोढरे), वनरक्षक अजय महिरे (बोढरे), भिलू काळे व शेरा राठोड आदी उपस्थित होते.