यावल प्रतिनिधी । येथील नगरपरिषद संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या त्या वादग्रस्त बोगस शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरणी शालेय समितीचे तत्कालीन अध्यक्ष नगरसेवक दीपक रामचंद्र बेहडे व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. वाघ यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी शिक्षणाधिकारी जळगाव यांना पत्रान्वये कळविले आहे. यामुळे संबंधीतांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने यावलमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी उच्च विद्यालयात ८ मार्च २०१९ रोजी शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता नियमबाह्य रित्या बोगस शिक्षकेतर भरतीसाठी एक कनिष्ठ लिपिक व ३ प्रयोगशाळा परिचर अशा जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यानंतर लागलीच घाईघाईने संशयास्पदरीत्या ९ मार्च २०१९ रोजी तीन कर्मचार्यांना नियुक्त पत्र देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात या नियुक्त्या मागील तारखे दाखवून हजेरी पत्रकावर मागील तारखेच्या स्वाक्षरी घेऊन नियुक्ती पत्र देण्यात आल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते यांच्यासह सात नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या भरती प्रक्रिया शासनाची पूर्वपरवानगी न घेता करण्यात आल्याने ती रद्द करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे कारवाई करावी यासाठी शिक्षणाधिकारी यांचेसह इतर विभागात तक्रार केली होती त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी जळगाव यांनी वरील प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी प्रत्यक्ष विद्यालयात भेट देऊन व मुख्याध्यापक वाघ यांचेकडील कागदपत्र तपासून शिक्षणाधिकारी जळगाव यांना अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी यांनी भरती नियमबाह्य असल्याने नियुक्त पदांना मान्यता देता येणार नाही, असे विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना कळविले होते व तसा अहवाल जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना सादर केला होता. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी भरती रद्द करून मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद यावल, मुख्याध्यापक साने गुरुजी विद्यालय यांचा युक्तिवाद ऐकून या भरती प्रकरणी शालेय समिती अध्यक्ष दिपक रामचंद्र बेहेडे व शालेय समितीचे सचिव असलेले मुख्याध्यापक एस. आर. वाघ हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर शासन निर्णयाच्या तरतुदीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना दिले आहेत. यामुळे शिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे. जाणकारांच्या मते या निर्देशानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००