जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील ६३ किलो वजन गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दिशा पाटील या विद्यार्थिनीने रौप्य पदक पटकावले आहे.
नोएडा येथे खेलो इंडिया २०२२-२३ राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेतील बॉक्सिंग क्रीडा प्रकारात दिशा पाटील हिने सेमी फायनल मध्ये हरीयाणाच्या कुरुक्षेत्र विद्यापीठाची खेळाडू सिवी बुरा हिचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शुक्रवारी अंतिम फेरीत तिची लढत राजस्थानच्या महाराजा गंगासिंग विद्यापीठाची खेळाडू कल्पना चौधरी हिच्या समवेत झाली. कल्पना चौधरीने ३-२ ने मात करुन सुवर्णपदक जिंकले तर कबचौउमविच्या दिशा पाटीलला रौप्य पदक प्राप्त झाले. विद्यापीठाची महिला गटातील बॉक्सिंग मध्ये पदक प्राप्त करणारी दिशा पहिली खेळाडू ठरली आहे. नुतन मराठा महाविद्यालयात ती शिक्षण घेते. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक डॉ.एल.के.प्रताळे (एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर व संघ व्यवस्थापक प्रा.उमेश पाटील (व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर) यांनी मार्गदर्शन केले. दिशाच्या यशाबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी अभिनंदन केले अशी माहिती क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी दिली.