बंगळुरू : वृत्तसंस्था । सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं अनावश्यक हस्तक्षेप का करीत आहेत? हा मुद्दा फार पूर्वीपासून होता. सामान्य लोकांना त्रास होत आहे. आमचे राज्य सरकार पंतप्रधानांचं नाव हस्तक्षेप करण्यासाठी का आणत आहे? माझ्या म्हणण्यानुसार कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.” असं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.
दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. एवढंच नाहीतर गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, गाडीवरील भगव्या फलकास काळे फासण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. यावर शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले, कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ज्या प्रकारे बेळगावमध्ये कर्नाटक भाजपाप्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ले करत आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे. भाजपाला किंवा केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार सुरू आहे, असं ते म्हणत आहेत, त्याबद्दल त्यांना खूप चिंता आहे. मात्र बेळगावमध्ये आठ दिवसांपासून आमच्या लोकांवर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहेत, खुनी खेळ सुरू आहे. त्याबाबत भाजपाचा कोणताही वरिष्ठ नेता, केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधान काहीच बोलत नाही?” असं संजय राऊत म्हणाले होते.