मुंबई, वृत्तसेवा । बेळगाव जवळील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी खरमरीत पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी येडीयुरप्पांना मराठी आणि कन्नाड भाषिक वाद टाळवा अशी विनंती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचं दैवत आहेत. मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिक असा वाद निर्माण होऊ देऊ नका. यापूर्वीच मनगुत्ती घटनेवरून महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आणखी वाद टाळा, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी पत्रात उल्लेख केला आहे. तसेच पिरणवाडी – मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्या कन्नड संघटनावर योग्य कार्यवाही करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण –
बेळगाव शहरानजीकच्या पिरणवाडी या गावात शिवाजी महाराज आणि संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्यावरून वाद सुरू झाला आहे. पिरणवाडी या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून या चौकाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या चौकात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न काही दिवस सुरू होता. त्याला मराठी भाषिकांचा विरोध आहे. तरीही मध्यरात्री तीन ते चार वाजता शिवाजी चौकात अचानक संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसविण्यात आला. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर मराठी भाषिक आक्रमक झाले. रस्त्यावर उतरून मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी पोलिसानी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.या पुतळ्यावरून मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये वाद सुरू झाला या भागातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.