पाटणा वृत्तसंस्था । बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी जनता दल युनायटेड अर्थात जेडीयूत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर राजकारणात प्रवेश करण्याच्या अटकळी गुप्तेश्वर पांडे यांनी वारंवार फेटाळून लावल्या होत्या.
पांडेंनी शनिवारीही नितीश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र पक्षप्रवेशासाठी नाही तर नितीश कुमार यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया त्यांनी भेटीनंतर दिली होती. मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद दिले. बिहारच्या डीजीपी पदावर असताना त्यांनी मला काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे त्यांना धन्यवाद देणं माझं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले होते.
माझं फायनल झालं की तुम्हाला सांगतो, असं म्हणत त्यांनी काही प्रश्न अनुत्तरित ठेवले होते. मात्र बिहार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जेडीयूतील प्रवेशामुळे पांडेंचा निवडणूक लढवण्याचा मनसुबा उघड झाला आहे.