बिल गेट्स यांच्या प्रकल्पात ५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीची अंबानींची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जगातिल दिग्गज उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या क्लिन एनर्जीच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचं नाव बिल गेट्स, जेफ बेझोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅक मा, मासायोशी सोन यांसारख्या दिग्गज गुतवणुकदारांच्या यादीत आलं आहे.

या सर्व गुंतवणुकदारांनी बिल गेट्स यांच्या क्लिन एनर्जी या उपक्रमाच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये गुंतवणूक केली आहे. याप्रकारे या फंडमध्ये रिलायन्स ५.७५ टक्क्यांचं आपलं योगदान देणार आहे. पुढील ८ ते १० वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यां रिलायन्स ही गुंतवणूक करणार आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजनं गुरूवारी बाजाराला हि माहिती दिली. “कंपनीनं ब्रेकथ्रू एनर्जी सेकंड, एलपीमध्ये ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी एक करार केला आहे. ही एक लिमिटेड पार्टनरशिप फर्म आहे. ज्याची स्थापना अमेरिकेच्या डेलवेअर स्टेटच्या कायद्यांतर्गत झाली आहे,” असं रिलायन्सकडून बाजाराला सांगण्यात आलं.

बिल गेट्स यांचा ग्रीन एनर्जी व्हेंचर महत्त्वपूर्ण उपक्रम असून ऊर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी गुंतवणूक करून हवामान बदलावरील तोडगा शोधण्याचं काम केलं जातं. या फंडचा उद्देश कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन न करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हा आहे. “या सर्व प्रयत्नांना भारतालाही फायदा होणार असून संपूर्ण मानवजातीलाच याचा उपयोग होईल. या गुंतवणुकीसाठी सध्या रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी घ्यावी लागणारआहे,” असंही रिलायन्सकडून सांगण्यात आलं.

Protected Content