जळगाव, प्रतिनिधी । स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित एकोणिसावा बालगंधर्व संगीत महोत्सव १ ते ३ जानेवारी २०२१ पर्यंत जळगावात होत असल्याची माहिती चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी प्रा. शरदचंद्र छापेकर, दीपिका चांदोरकर, अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पळून महोत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिरात करण्यात आले असून आसन क्षमतेच्या ५० टक्के रसिकांना या मोहत्सवास उपस्थित राहता येणार आहे. या महोत्सवास १ जानेवारीला सूर नवा ध्यास नवा फेम शरयू दाते हिच्या गायनाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. द्वितीय सत्रात मुंबई येथील अश्विन श्रीनिवास यांचे बासरी वादन होणार आहे. त्यांना तबल्याची साथ ओजस अढिया तर गिटारची साथ कलकत्याचे संजय दास करणार आहेत. द्वितीय दिनाची सुरुवात कलकत्ता येथील संगीत रिसर्च अकादमीचे गुरु ओमकार दादरकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होईल. त्यांना तबला संगत चारुदत्त फडके तर संवादिनी संगत मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. द्वितीय सत्रात प्रख्यात नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनिस व सहकारी बॉलीवूड फुट प्रिंट्स हा नृत्याविष्कार कत्थकच्या माध्यमातून सादर करणार आहेत. तृतीय दिनाच्या प्रथम सत्रात ओरिसा येथील गोटीपुवा या लोकनृत्याचे सादरीकरण समूह नृत्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासोबत प्रख्यात नृत्यांगना सुश्री मोहंती यांचे ओडिसी नृत्य सादर होणार आहे. १९ व्या बालगंधर्व मोहत्सवाची सांगता संगीत दिग्दर्शक देवेंद्र भोमे यांनी मराठी चित्रपट संगीतातील सुवर्ण काळ म्हणून ओळख असलेल्या १९१० ते १९६० या काळातील संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना नव्याने संगीतबद्ध केले आहे. याचे लेखन, दिग्दर्शन व संगीत संयोजन देवेंद्र भोमे यांनी केले असून जयदीप वैद्य, आशुतोष मुंगळे, श्रुती आठवले, मुक्ता जोशी, केतन पवार व देवेंद्र भोमे यांचा सहभाग असणार आहे. गौतमी देशपांडे व अभिजित खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/755069125365634