यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातील १२ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहून तिची प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सोळा वर्षाच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात एक १२ वर्षाची मुलगी ही आपले आई-वडिल आणि भावंडांसह राहते. सर्व जण मोलमजुरी करून पोट भरत असल्याने शेतात जातात. दरम्यान, घरातील सर्व जण शेतात गेल्यानंतर एक सोळा वर्षाचा मुलगा हा तिच्या घरात येऊन तिच्यावर अत्याचार करू लागला. तिने हे कुणाकडे सांगितल्यास घरातील सर्वांना मारून टाकण्याची तो धमकी देत असल्याने तिने अत्याचार सहन केला.
दरम्यान, गेल्या महिन्यात संबंधीत मुलीच्या आईला तिची पाळी चुकल्याचे दिसून आले. यानंतर या अत्याचाराची माहिती त्यांना मिळाली. तर, गर्भाची जास्त वाढ झालेली असल्याने गर्भपात करण्यात आला नाही. यानंतर संबंधीत मुलीने कालच मुलास जन्म दिला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी यावल पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार या सोळा वर्षाच्या मुलाच्या विरोधात विरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.