औरंगाबाद प्रतिनिधी । अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ओढले आहेत.
वादग्रस्त प्रकरण
बीडच्या मुरंबी गावात राहणार्या साहेबराव वाघमारे यांनी बिभीषण माने यांच्याविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे तक्रार केली होती. माने यांचं स्वस्त धान्य दुकान आहे. मात्र ते शिधापत्रिकाधारकांना स्वस्त माल न देता तो काळ्या बाजारात विकतात, असा आरोप त्यांनी केला होता. अंबाजोगाईच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी करून दुकानदार माने दोषी आढळल्यानं त्यांचा परवाना रद्द केला होता. जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी केलेल्या चौकशीतही माने दोषी आढळले होते. यानंतर शेवटी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पोहोचलं. बापट यांनी दुकानदार माने याला पुन्हा परवाना बहाल केला केला होता.
न्यायालयाच्या कानपिचक्या
वाघमारे यांनी या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीत न्यायालयाने गिरीश बापट यांच्यावर कडक ताशेरे ओढले. मंत्री जनतेचे विश्वस्त असतात. मात्र बापट यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश दिले, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं बापट यांना धारेवर धरले.