पाचोरा, प्रतिनिधी। गत वर्षापेक्षा यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने गिरणा धरणासोबतच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यात पाचोरा तालुक्यातील बहुळा धरणात देखील पुरेसा जलसाठा असल्याने रब्बी पिकांसाठी या धरणातून पहिले आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बहुळा धरणातून नांद्रासह परिसरातील गावातील शेतकरी वर्गासाठी रब्बी हंगाम पेरणीसाठी किमान पाच पाण्याची आवर्तने सुटतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. कोरडवाहु शेतकरी यांनी आप आपले शेतातील अगोदरची खरिप पिके घेऊन पुढील रब्बी पिके पेरणीसाठी शेती मशागत करून पेरणीसाठी शेत तयारीला वेग लावला असून यासाठी बहूळा धरणातुन पहिले आवर्तन तात्काळ सोडण्यात येण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावर्षी समाधानकारक पावसाळा असल्याने निदान कोरडवाहु शेतकरीवर्ग पाण्या अभावी एकच पिक घेत होता. परंतु, या वर्षी बहुळा धरण तुडूंब भरले असल्याने योग्य नियोजन करुन खरीप हंगामासाठी ज्वारी, दादर, बाजरी, मका, सूर्यफुल अशा या तिमाही पिकांना धरणाची किमान चार ते पाच आवर्तने योग्य वेळेवर जर सुटले तर रब्बी पिके ही घेता येतील व याचा फायदा परिसरातील शेतकरी वर्गाला घेता येईल. यासाठी बहुळा पाटचारी साफसफाई काम सुरू करून लवकरच पाण्याचा आवर्तन सोडण्याची मागणी नांद्रा सह वेरुळी, खेडगाव (नंदीचे), हडसन, वडगाव, लासगाव येथील शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे.