जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने सादर केलेला बजेट हा देशातील सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारा ठरला आहे. याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बहुजन मुक्ती पार्टीतर्फे “बजेट जलाओ आंदोलन” करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारने स्थापन केलेल्या बजेटमध्ये शैक्षणिक , अरोग्य, शेती, ग्रामविकास, प्रधानमंत्री पिक योजना, मनरेगा योजना, अल्पसंख्यांक कार्यालय अशा वेगवेगळ्या विभागासाठी भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने राज्यभरात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बजेट जलाओ आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू खरे यांच्या नेतृत्वात बजेट जलाओ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष विनोद अडकमोल, जिल्हा कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, अमजद रंगरेज यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.