जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा “उत्कर्ष”चे आयोजन करण्यात आले आहे.
विविध स्पर्धा होणार
या राज्यस्तरीय उत्कर्ष स्पर्धेत महाराष्ट्रातील कृषी व अकृषी विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे ३५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या एका संघात रासेयोचे ९ विद्यार्थी व ९ विद्यार्थिंनी आणि एक संघ व्यवस्थापक यांचा समावेश असले. या उत्कर्ष स्पर्धेत भारतीय लोककला, लोकवाद्य, संकल्पना नृत्य, काव्यवाचन, भित्तीचित्र, वक्तृत्व, निबंध, समुहगीत, छायाचित्रण या स्पर्धा होणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे
मंगळवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत अशी शोभायात्रा निघेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल. बुधवार २९ रोजी सकाळी ९ वाजता पोवाडा, भारुड व भजन या भारतीय लोककलांची स्पर्धा होईल. त्यानंतर भित्तीपत्रक व कार्यप्रसिध्दी अहवाल प्रदर्शन होणार आहे. सकाळी ११ वाजता भारतीय लोकवाद्याची स्पर्धा होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता संकल्पनानृत्य स्पर्धा होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता काव्यवाचन स्पर्धा होईल. गुरुवार ३० जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता पथनाट्य स्पर्धा, सकाळी ११.३० वाजता निबंध स्पर्धा, दुपारी २.३० वाजता समुहगीत, सायंकाळी ५.३० वाजता घोषवाक्यासह भित्तीचित्र स्पर्धा आणि त्याच वेळी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पारितोषिक वितरण होईल.
या सर्व स्पर्धा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात व अधिसभा सभागृहात होणार आहेत. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्यांच्या बैठका नुकत्याच झाल्या अशी माहिती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा उपक्रम सचिव डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी दिली.