रावेर प्रतिनिधी । रावेर-कांडवेल बस नियमित करावी, या मागणीसाठी कांडवेल येथील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी धामोडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
कांडवेल येथील १२५ विद्यार्थी ऐनपूरला शिक्षणासाठी येतात. यासाठी सकाळी रावेर-कांडवेल ही रावेर आगाराची बस ९.३० वाजता येते. ही बस कांडवेल-ऐनपूर मार्गे रावेरसाठी निघते. मात्र, रावेर आगाराच्या गलथान कारभारामुळे ही बस तीन दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी धामोडी फाट्याजवळ ऐनपूर-निंभोरा रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. वाहतूक नियंत्रक पी.डी.चौधरी यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेवर सोडण्याचे आश्वासन दिल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.