सिएटल: वृत्तसंस्था । ‘बर्लिन पेशंट’ म्हणून ओळख असणाऱ्या टिमथी रे ब्राउन यांचे निधन झाले आहे. ब्राउन यांनी एचआयव्ही एड्ससारख्या आजारावर मात केली होती. एचआयव्हीवर मात करणारे ते पहिलेच व्यक्ती होते. कर्करोगाच्या आजाराने त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.
ब्राउन यांना २००७ मध्ये कर्करोगाचा आजार असल्याचे समोर आले होते. निधनासमयी त्यांचे वय ५४ होते. ब्राउन यांना १९९४ मध्ये एचआयव्हीची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर २००७ मध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले.
एचआयव्हीवरील उपचारासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले. बोनमॅरो दात्याच्या डीएनएमध्ये CCR5 जीनमध्ये म्युटेशन होते. यामुळे एचआयव्ही विरोधात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झाली होती. ब्राउन हे २००८ मध्ये एचआयव्ही संसर्गमुक्त झाले असल्याचे जाहीर करण्यात आले.
ब्राउन हे १९९३ ते २०१० दरम्यान बर्लिन येथील एका कॅफेत जर्मन-इंग्रजी भाषांतरकार म्हणून काम करत होते.
या उपचारानंतर ब्राउन यांच्या रक्तात एचआयव्हीचा संसर्ग कमी झाला. त्यामुळे अॅण्टी-रेट्रोव्हायरल थेरेपीची आवश्यकता राहिली नाही. या वर्षी त्यांना पुन्हा कर्करोग झाला. हा कर्करोग मेंदू आणि मणक्यात पसरला होता. एचआयव्हीवर मात करणाऱ्या ब्राउन यांची झुंज कर्करोगासमोर अपयशी ठरली. अखेर २९ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
जगभरात एचआयव्ही-एड्सची बाधा झालेले ३८ दशलक्ष रुग्ण आहेत. बोनमॅरो उपचार पद्धत अतिशय महागडी आहे. हा खर्च बहुतांशी बाधितांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे या उपचार पद्धतीचा फारसा अवलंब केला जात नाही.