दिल्ली , पंजाब , केरळात कोरोनाची दुसरी लाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात आजपासून अनलॉक ५ गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या आहेत. सिनेगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, दिल्ली ,केरळ आणि पंजाबमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक ठरलीय.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट अनेकांसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यातच सणासुदीचे दिवस तोंडावर आल्यानं चिंतेच्या परिस्थितीत आणखीनच वाढ होऊ शकते. थंडीच्या दिवसांत अधिक काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

दिल्ली, केरळमध्ये कोविड १९ संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. दिल्लीत पहिली लाट जूनमध्ये पाहायला मिळाली होती. दररोज ३००० रुग्णांची भर पडत होती. दरम्यान दिल्लीत दररोज १००० रुग्णांची भर पडत होती.

दिल्लीत ९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ४०३९ रुग्ण आढळल्यानं प्रशासनालाही धक्का बसला होता. दिल्लीत आत्तापर्यंत एकूण संक्रमितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेलीय. बुधवारी दिल्लीत ३८२७ नवीन रुग्ण आढळलेत.

नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी धोक्याचा इशारा दिलाय. ‘दिल्ली, पंजाब आणि केरळमध्ये संक्रमणाची दुसरी लाट पाहू शकतोय’ असं पॉल यांनी म्हटलंय.

केरळमध्येही संक्रमितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येतेय. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात थोडी घट दिसून आली होती. परंतु, १६-२२ सप्टेंबर दरम्यान पुन्हा संक्रमितांची संख्या वाढली. २३-२९ सप्टेंबरच्या आठवड्यात राज्यात ५८९८ नवीन रुग्ण आढळले.

पंजाबमध्ये मंगळवारपर्यंत कोविड १० चे १६८२४ नवीन रुग्ण आढळलेत. राज्यातील पाच शहरांत लुधियाना, जालंधर, मोहाली, अमृतसर आणि पटियाला यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आलीय. राज्यात ३३५९ करोना मृत्यू नोंदवण्यात आलेत एकूण रुग्णांची संख्या १,१२,४६० वर पोहचलीय.

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के श्रीनाथ रेड्डी यांनी दुर्गापूजा, छठ, दिवाळी यांसारखे सण साजरे करताना मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. सणांच्या दिवसांत काळजी घेण्याचीही अधिक गरज आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. थंडीच्या दिवसांत श्वसनाशी संबंधीत आजारांत आपसूकच वाढ दिसून येते. सतर्क राहणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

Protected Content